Ad will apear here
Next
स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी... माई सावरकर
....माई सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजोमय जीवनपटामागील स्त्रीशक्ती. आठ नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्यांचे त्यागमय आणि स्फूर्तिदायक जीवन उलगडण्यासाठी साधना योगेश जोशी यांनी ‘स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी - माई सावरकर’ हे पुस्तक लिहिले असून, व्यास क्रिएशन्सने ते प्रकाशित केले आहे. प्रभाकर या पुत्राच्या मृत्यूच्या दुःखद प्रसंगाचे वर्णन करणारा या पुस्तकातील हा अंश...
......
अशा क्रांतिकारकांच्या सहवासात साऱ्यांचाच विरंगुळा म्हणजे आमचा लहानगा प्रभा. सगळं वातावरण हलकंफुलकं करून टाकायचा. थोरले भाऊजी आणि बाळ भाऊजी यांच्या क्रांतिकार्याची बहुतेक सरकारला कुणकुण लागली असावी, म्हणून की काय अगदी वरचेवर घराची झडती होत असे. नाशिकच्या तीळभांडेश्वर बोळातील दातारांच्या घरात असताना असाच एक प्रसंग ओढवला. झडतीसाठी पोलीस आले. मी, बाई, प्रभा आणि बाबा घरात होतो. घराभोवती बंदूकधारी पोलिसांचा खडा पहारा. घरातले पोलीस घराचा कोपरा न् कोपरा शोधत होते. प्रभा लहान असल्याने झडती चालू असतानाही तो घरभर हिंडत होता. हिंडता हिंडता तो घराबाहेर आला. त्याने उभे बंदूकधारी पोलीस पाहिले आणि त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, ‘आमच्या बाबांकडेही अशा बंदुका आहेत.’

त्या बोलण्याने पोलीस चमकले. त्यांना संशय आला. लागलीच त्यांनी आमच्याकडे चौकशी सुरू केली. काय उत्तर द्यावं? म्हणून सगळेच संभ्रमात पडले आणि अचानक मला आठवलं सहजपणे मी म्हणाले, ‘अहो प्रभाकरचे आजोबा श्री. चिपळूणकर हे जव्हार संस्थानचे दिवाण असल्याने त्यांच्या घरी अशा बंदुका आहेत. त्यांनाही बाबाच म्हणतो प्रभाकर. प्रभाने त्यांचा उल्लेख केला. बाबा सावरकरांचा नव्हे.’

माझ्या या प्रसंगावधानतेमुळे निदान ती वेळ मारून नेली होती. साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला होता; पण आता यापुढे खूप काळजी घ्यावी लागणार असं बाबा म्हणाले. आणि या घटनेचं गांभीर्य माझ्याही ध्यानात आलं. मध्यंतरी मी जव्हारला माहेरी जाऊन आले. तेव्हा माझी खालावलेली तब्येत बघून आई खोदून विचारत होती. ‘माई किती गं वाळलीस? काय झालंय? अगं उपासतापास करावेत; पण प्रकृतीला पेलेल एवढेच.’ 

तिची ती काळजी, माया मला आतून पोखरत होती. तिला ओरडून माझ्या काळजीचं कारण सांगावंसं वाटतं होतं. सगळं मन मोकळं करावंसं वाटत होतं. आई मला वेगळीच चिंता सतावतेय गं! हे सुखरूप परत येतील ना? पण स्वारींना दिलेलं वचन आठवलं मी गप्प राहिले. ‘काही नाही गं’  म्हणून वेळ मारून नेली. आणि पुन्हा नाशिकला आले. माझ्या मनातलं हे वादळ मला पुढील वादळाची पूर्वसूचना तर देत नव्हतं. येणाऱ्या कठीण परिस्थितीची ती चाहूल तर नव्हती. काहीही असो पण चित्त थाऱ्यावर नव्हतं एवढं मात्र खरं. या अशांत मनाने मी धाव घेतली माझ्या सखीकडे, माझ्या सुखदुःखाच्या सोबतीणीकडे... गोदामाईकडे... तीच आता माझ्या जिवाचा विसावा होता. 

तिच्याकडे मी माझं मन निःसंकोच मोकळं करू शकत होते. धुणं धुण्याच्या निमित्ताने तिच्या घाटावर यावं आणि रडून मनःशांती मिळवावी. आजूबाजूच्या बायांना रडणं कळू नये म्हणून सारखा गोदामाईच्या पाण्याने चेहरा धुवायचा म्हणजे त्या मायेच्या गोड्या पाण्यात माझ्या डोळ्यातलं खारं पाणी बेमालूमपणे मिसळून जायचं. समाजाच्या सत्कृतीचं आणि विकृतीचंही दर्शन मला आताशा घडायला लागलं होतं.

त्या दिवशीही मी नेहमीप्रमाणे गंगामाईची पूजा करून आले; मात्र आज घरात आल्याबरोबर प्रभाची नेहमीची बडबड आणि दंगा ऐकू आला नाही. बाईंना विचारलं तर म्हणात्या, ‘अग आज स्वारी जरा नरमगरमच दिसतेय. बघ जरा त्याला. म्हणून मी त्याला मांडीवर घेतलं. अंगाला हात लावला तर प्रभा तापाने फणफणलेला. माझा जीव अगदी घाबरा झाला. पांघरूण घालून मी त्याला निजवलं आणि बाईंना हाक मारली. बाईंनी त्याला निरखून पाहिलं तर त्याच्या अंगावर बारीकशी उगवण दिसली. म्हणजे प्रभाला देवी आल्या की काय? आम्हा दोघींची तर भीतीने गाळणच उडाली. त्या भीतीचं वर्णन करणं शब्दांच्या पलीकडचं होतं. तातडीने वैद्यांना बोलावलं. उपचार सुरू झाले. वैद्यांचे औषध, पथ्यपाणी सुरू झाले. घरातील आणि ओळखीच्या वडीलधाऱ्या स्त्रियांकडून जे उपाय सुचविले जात होते. तेही योजून पाहिले जात होते. त्या वेळी असाच एक उपाय सुचविला गेला, की प्रभाला कोमट पाण्याने आंघोळ घातली म्हणजे देवीची लस बाहेर पडेल व त्याला बरे वाटेल. माझं मन इतकं सैरभैर झालं होतं, की मी काहीही करायला तयार होते; पण प्रभाला बरं वाटू दे. 

या मनःस्थितीत मी हे ठार विसरून गेले की देवीच्या आजारात रोग्याच्या शरीराला पाण्याचा स्पर्शही करायचा नसतो. इतकंच काय पिण्यासही पाणी बेताचंच द्यायचं असतं; पण काय सांगू? मी माझ्या प्रभाला उपाय सुचविल्याप्रमाणे कोमट पाण्याने आंघोळ घातली. त्याचा व्हायचा तोच उलटा परिणाम झाला. त्याचा ताप चढला आणि देवीच्या फोडात पाणी गेल्याने फोड चिघळले. सर्वांग जखमांनी भरलं. तीळ ठेवायलाही जागा उरली नाही. माझा आणि इतरांचा अनअनुभव माझ्या प्रभाच्या जीवावर उठला. ‘प्रभाला देवीची लस द्या’  हे स्वारींचं सांगणं कानात घुमू लागलं. या धावपळीत ते राहूनच गेलं होतं. काय आणि कसं? हा प्रश्न राक्षसासारखा माझ्यासमोर उभा राहिला. माझ्या मनाची अशांती तुम्हाला काय सांगू? मी माझी राहिलेच नव्हते तेव्हा. अखेर दोन-तीन दिवसांत प्रभा बडबडू लागला. त्याला वात झाला. पाण्याबाहेर काढलेल्या माश्यासारखा तो तळमळत होता. स्वारींचा प्रभा माझ्या मांडीवर ‘आ’ वासून माझ्याकडे गलितगात्र नजरेने पाहत होता. 

ती नजर... शून्य नजर.. माझ्या  प्रभाची... प्रभाला अखेरची घरघर लागली... त्यातही माझा पदर खेचून तो म्हणत होता, ‘माई मला कढी हवीय, मला दूध हवंय.. माई कढी दे.. दूध दे...माई... कढी .... दूध....’ एका क्षणी तो आर्त आवाज थांबला. शांत भेसूर भुतावळीची शांतता.. माझ्याच मांडीवर माझ्या जीवाने शेवटचा श्वास घेतला.... हलाहल विषाचा दाह कमी पडला होता माझ्या या पुत्रशोकापुढे. आमच्या कुटुंबाच्या दैन्यावस्थेमुळे माझ्या बाळाची शेवटची इच्छा कपभर दुधाचीसुद्धा मी पूर्ण करू शकले नाही. यासाठी मी पुढे आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकले नाही. माझा प्रभा, माझं जगण्याचं कारण... मला कायमचा सोडून गेला... आता किती रडू? कशाकशावर रडू? मला रडूच येईनासं झालं, डोळ्यातलं पाणी जणू आटलंच. जोरजोरात ओरडावंसं वाटतं होतं. अस्सं धावत जाऊन आईच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडावंसं वाटतं होतं... सारं सारं मनातलं तिच्यापाशी बोलावंसं... तिला सांगावंसं वाटतं होतं... ती घुसमट, ते दुःख, त्या वेदना पिळवटून काढणारे विचार, अगदी असह्य झालं होतं. माझ्या काळजाचा तुकडाच काळपुरुषाने तोडून नेला होता. 

त्या वेळच्या रूढीनुसार मी सवाष्ण म्हणून ‘प्रभा मेला नव्हता. खेळायला गेला होता. गोदामाईकडे कधीही परत घरी न येण्याच्या अटीवर! पुन्हा प्रभा माझ्या ओटीत खेळेल,’ असा आशीर्वाद पोक्त स्त्रियांनी दिला. माझी ओटी भरली-माझं जीवन पुनः सुरू झालं...

स्वारींनी मांडलेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या चक्रव्यूहात प्रभा अभिमन्यूसारखा बळी गेला. पिता लढाईला गेल्यावर वीरपुत्राचं मरण ते! आमच्या संसाराच्या सारीपाटातला पहिला डाव प्रभाच्या रूपाने आम्ही देव गजाननाला स्वातंत्र्ययुद्धातील सिद्धीसाठी दान दिला... माझ्या वयाच्या २०व्या वर्षी माझ्या चार वर्षांच्या प्रभाची आहुती दिली गेली. साधारणतः ते वर्ष फेब्रुवारी १९०९ असावं.

हे दुःखद वृत्त स्वारींना इंग्लंडला कळवलं गेलं. धैर्याचा महामेरूच ते. प्रभाच्या आठवणीने कळवळले. त्यावेळी ते ‘शिखांचा इतिहास’ हा ग्रंथ लिहीत होते. आमच्या प्रभाची स्मृती चिरंतन राहावी म्हणून हा ग्रंथ स्वारींनी प्रभालाच अर्पण केला. ही अर्पण पत्रिका काव्यरूपात होती...

प्रभ्या, प्रियकरा, होतासी बहु दिवस असा सख्या
अमूर्त तू कल्पना एक मधु-मधुर अशी हृदया
धरुनि मनी मी उत्सुक असता विदेशी-गमनाचे
प्रभ्या प्रियकरा कार्य उदेले प्रियजन-विरहाचे...

एक गोष्ट इथे ध्यानात घ्यायला हवी, की माणूस क्रांतिकारक म्हणून जन्माला येत नाही. तो क्रांतिकारक बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल-तुळस वाहून हे लोक बाहेर पडले, तरी प्रेम जिवंतच असतं ना हो? एक वेळ हलाहल विषाचा दाह कमी पडला असता आमच्या या पुत्रशोकापुढे... पण शेवटी बुद्धीने भावनेवर विजय मिळवलाच. 

(‘स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी - माई सावरकर’ हे साधना जोशी लिखित पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZQHCI
Similar Posts
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर... ‘रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?’ समकालीन
मातृभूमीसाठी सावरकरांनी घेतलेली शपथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी खरी करून दाखवली. ‘अभिनव भारत’ ही संघटना सुरू करताना त्यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींनाही कसे मार्गदर्शन केले होते आणि त्यांचे विचार किती स्पष्ट होते, याची झलक दाखविणारा, वि
छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींना लिहितात – ‘श्री सद्गुरुवर्य श्री सकलतीर्थरूप...’ समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते, यावरून काही काळापूर्वी विनाकारण उलटसुलट चर्चा सुरू करून संभ्रम निर्माण करण्यात येत होता. शिवाजी महाराज मात्र रामदास स्वामींना गुरुस्थानी मानत होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पुरावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना १५ ऑक्टोबर १६७८ रोजी लिहिलेले पत्र
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language